रशियाचे अध्यक्षपदी ब्रेझनेव्ह यांची निवड
मॉस्को – लिओनिद ब्रेझनेव्ह यांची रशियाचे अध्यक्ष सुप्रीम सोव्हियतने निवड केल्याचे जाहीर केले. त्यांची निवड जाहीर होताच सोव्हियत पार्लमेंटच्या सभासदांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्या निवडीचे स्वागत केले.
पक्षाचा अध्यक्ष तोच राष्ट्राध्यक्ष होण्याचा हा रशियाच्या इतिहासात पहिलाच प्रसंग आहे. अर्थात पूर्व युरोपात यापूर्वी स्टॅलिन व क्रुश्चेव्ह यांनीच पक्षप्रमुखत्व व सरकारी प्रमुखपद भूषविले होते. परंतु पुढे ही प्रथा व्यक्तिपूजेस उत्तेजन देईल म्हणून बंद केली.
“मिसा’ रद्द करण्याबाबत विचार
नवी दिल्ली – गृहमंत्री चरणसिंग यांनी असे सांगितले की सरकारच्या दृष्टीने नक्षलवादी कैदी हे राजकीय कैदीच होत. मात्र त्यांची कृत्ये सरकारला पसंत नाहीत. ते पुढे म्हणाले, “मिसा’ कायदा रद्द करण्याचा सरकारचा विचार चालू आहे.
परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी असे सांगितले की पाकच्या ताब्यात अद्यापि 90 भारतीय लोक आहेत. पण पाकने फक्त 37 भारतीय लोकांची माहिती पुरविली आहे. बाकीच्यांची माहिती पाकिस्तानकडून मिळविण्याचा प्रयत्न चालू आहे.