पुणे : सदनिकेच्या झालेल्या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या इस्टेट एजंटवर एका वकील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत आरोपीने वकिल महिलेचे बदनामिकारक फ्लेक्स शनिपार चौकात लावले होते. तसेच त्यांची सोशल मिडियावर बदनामी देखील केली होती.
संतोष पंडीत (490, रा. सदाशिव पेठ, विश्रामबाग पुणे) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 50 वर्षीय वकील महिलेनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा वकीली व्यवसाय आहे, तर पंडीत हा इस्टेट एजंट आहे. फिर्यादी यांनी मागील वर्षी सदाशिव पेठेतील एक सदनिका खरेदी केली होती. त्या सदनिकेच्या व्यवहारामध्ये पंडीत हा मध्यस्थ म्हणून काम पाहत होता. त्याला 57 हजार 375 रूपये फिर्यादी यांनी धनादेशाने दिले होते. तरी तो फिर्यादींकडे गैरसमजाने आणखी 57 हजार 350 मागत होता. याच पैशासाठी त्याने फिर्यादी यांना निरनिराळ्या प्रकारे त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्याने महिलेच्या नावाचे शिल्लक राहिलेल्या पैशाबाबत बोर्ड बनवून ते शनिपार चौकात लावले. तसेच त्यांचे फोटो विविध व्हॉट्सऍप ग्रुपवर देखील पाठवले. याचदरम्यान त्याने महिलेचा पाठलाग करून त्यांना जीवे मारण्याची तसेच सनद घालविण्याची धमकी दिली. तसेच स्वतःच्या फेसबुक पेजवर महिलेविषयी वाईट शब्दात लिहले. तसेच त्यांना अश्लिल भाषेत ईमेल पाठविला. याप्रकरणी पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.