पुणे – वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा सहा जणांच्या टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये सराफा दुकानातील कामगारांना मारहाण करण्यात आली. जातना आरोपींनी ४० ते ५० तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना महमदवाडी रस्त्यावरील वारकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्स येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम वानवडी पोलीस ठाण्यात सुरु आहे.
दरोड्याची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील , अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त आर.राजा, उपायुक्त(गुन्हे) अमोल झेंडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक पतंगे आदींनी धाव घेतली. दरम्यान आरोपींचे दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत.
यामध्ये काऊंटरच्या आत घुसून चालकाला मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे. तर इतर आरोपी दमदाटी करत सोने लूटून नेत आहेत. दरम्यान आरोपी दुचाकीवरुन आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा माग काढला जात आहे.