दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असणाऱ्या छपाक या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच या चित्रपटाविषयी अनेक चर्चा जोर धरु लागल्या आहेत. या निमित्ताने दीपिकाने ऍसिड हल्ल्याबाबत केलेली जनजागृती किंवा चित्रपटाच्या कथेवरून निर्माण झालेला वाद असे अनेक विषय पुढे आले आहेत.
या चर्चांच्या वर्तुळात काहीशा नकारात्मक आणि भुवया उंचावणाऱ्या मुद्यांनीही डोकं वर काढले आहे. ज्यापैकी एक म्हणजे लक्ष्मी अग्रवाल, या ऍसिड हल्ला पीडितेची चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवर असणारी नाराजी. लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनातील काही प्रसंगांचा चित्रपटासाठी आधार घेतला. या चित्रपटासाठी लक्ष्मीला 13 लाख रुपये इतकीच किंमत दिली गेल्यामुळे ती नाराज असल्याचे म्हटले जात होते.
ज्याविषयी लक्ष्मीनेच तिची प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत तिने एका बातमीचा स्क्रीनशॉट पोस्ट केला. यामध्ये तिने या बातमीवर मोठी फुली मारली होती. या फोटोच्या कॅप्शनमध्ये हे खोटे असल्याचे तिने सांगितले होते. लक्ष्मीने केलेला हा खुलासा पाहता चर्चांना पूर्णविराम मिळेल, असे म्हणायला हरकत नाही.