मनपा प्रशासनाची तत्त्वतः मंजुरी; नव्या मार्गावरून निओ मेट्रो धावणार
रिंगरोड बाधितांना काही अंशी दिलासा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील एचसीएमटीआर (उच्च क्षमता वाहतूक मार्ग-हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रुट रिंग रोड) या मार्गात बदल केल्याने नव्या मार्गावरून आता निओ मेट्रो धावणार आहे. त्यास पालिका प्रशासनाने नुकतीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
उल्लेखनीय आहे की सुमारे तीन वर्षांपूर्वी एचसीएमटीआरने पुन्हा डोक वर काढले होते. कालबाह्य झालेल्या या प्रकल्पामुळे हजारो नागरिकांच्या घरांवर कुऱ्हाड लटकत होती. नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात आंदोलन करुन या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. परंतु सत्ताधारी आणि प्रशासन ऐकण्यास तयार नव्हते. परंतु अचानकच गेल्या काही दिवसांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आपला पवित्रा बदलला. एचसीएमटीआरचा डीपीआर बनविण्याचे काम महामेट्रोला दिले होते. दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोकांची घरे वाचविण्यासाठी बदल करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर रिंगरोड बाधितांना काही अंशी दिलासा मिळाला.
महामेट्रोने केलेल्या सर्वेक्षणात रिंग रोडमध्ये बदल सुचलविले आहेत. त्यानुसार नवा मार्ग आखण्यात आला आहे. हा मार्ग नाशिक फाटा, पिंपळे गुरव, सुदर्शन नगर, कोकणे चौक, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, वेंगसरकर क्रिकेट ऍकॅडमी, संचेती स्कूल, क्रांतीवीर नगर, थेरगाव बिर्ला रूग्णालय, पवना नदी पार करून वाल्हेकरवाडी, रानमळा हॉटेल, स्पाईन रस्ता, रेलविहार चौक, आकुर्डी रेल्वे स्थानक, निसर्ग दर्शन सोसायटी, गायरान, निगडी भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक, स्पाईन रस्ता, त्रिवेणीगर, रूपी नगर, टाटा मोटर्स, जॅग्वार कंपनी समोरून इंद्रायणीनगर, स्वामी समर्थ स्कूल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी चौक, टेल्को रस्ता, सेंच्युरी एन्का, लांडेवाडी असा आहे.
नाशिक फाटा ते चाकण या मार्गावरून निओ मेट्रो प्रस्तावित आहे. त्यामुळे रिंग रोड पुणे-नाशिक महामार्गावरून घेण्यात आलेला नाही. या मार्गातून कासारवाडी, दापोडी व फुगेवाडी हा भाग वगळण्यात आला आहे. मार्गात बदल केल्याने हे अंतर 30 ऐवजी 31.40 किलोमीटर होणार आहे.
रिंग रोड 24 मीटर व त्यापेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्यावरून घेण्यात आला आहे. तसेच तो अनेक ठिकाणी बीआरटी मार्गावरून घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना बीआरटी, रिंग रोड, मेट्रो, निओ मेट्रो या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा वापर करणे सुलभ होणार आहे.
सर्वेक्षणानुसार निओ मेट्रो योग्यच – सवणे
पिंपरी-चिंचवड शहरातील एचसीएमटीआर मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्राथमिक सर्वेक्षणानुसार निओ मेट्रो योग्य आहे असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्त, सर्वसाधारण सभा यांच्या मान्यतेनंतर त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.