कोंढवा रोड येथून मजूर, कारागिर राजस्थानला रवाना
कात्रज – कात्रज-कोंढवा रोड परिसरात राहणाऱ्या राजस्थान येथील पाली व जालोट जिल्ह्यातील सुमारे 235 मजूर, कामगार आणि कारागिर यांना आवश्यक पोलीस परवानगी घेऊन माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले. गावी जाण्याचा आनंद चेहऱ्यावर तर पुणे सोडल्याचा दु:ख या कामगारांच्या डोळ्यात दिसून येत होते.
कात्रज-कोंढवा परिसरात राजस्थानातील मजूर, कामगार अधिक प्रमाणात आहेत. लॉकडाऊनचा कालवधीत वाढत असल्याने आणखी किती दिवस येथे काढणार यातून या मजूर, कामगारांनी आपल्या मूळ गावी जाण्याचे प्रयत्न सुरू केले होते. याकामी येथील माजी आमदार योगेश टिळेकर यांनी याकामी पुढाकार घेत सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करीत या कामगारांना घरी जाण्याची व्यवस्था केली. यावेळी परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, नगरसेविका वृषाली कामठे, चेतन टिळेकर व तुषार कदम आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
ट्रॅव्हल बसद्वारे या मजूर, कामगारांना त्यांच्यास मूळ गावी सोडण्यात येणार आहे.प्रवासात नाष्टा, जेवण यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. हडपसर विधानसभा कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र बाहेरील विविध राज्यातील 1700 मजूर, कामगार, कारागिरांसाठी ही परवानगी घेण्यात आली, असेही माजी आमदार टिळेकर यांनी सांगितले.
परराज्यातील मजूर, कामगार, कारागिर यांना त्यांच्या मूळ गावी जायचे होते. त्या दृष्टीने पोलिसांनी अर्ज मागितले, त्यानुसार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. योगेश टिळेकर यांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम व्यक्ती व संस्था यांनी पुढे येऊन अशी मदत करावी.
– सुहास बावचे, पोलीस उपायुक्त