कृष्णानदीतिरी गावोगावच्या पालख्यांची अनोखी भेट; प्रीतिसंगम गजबजला
कराड – वाजत गाजत कृष्णाबाईच्या भेटीस आलेल्या गावागावातील पालख्या, आबालवृद्धांचा उत्साह, व कृष्णाबाईच्या जयघोषाने प्रीतिसंगम भक्तिमय झाला. गोर-गरिबांना सुखात-समाधानात ठेव, असे साकडे भाविकांनी घालत कृष्णबाईचे दर्शन घेतले. कराडचे ग्रामदैवत असलेल्या कृष्णाबाईची यात्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राज्यभरासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी यात्रेसाठी उपस्थिती लावली होती.
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी भरत असलेल्या कृष्णाबाईच्या यात्रेसाठी ग्रामीण भागातून आलेल्या विविध देवदेवतांच्या पालख्यांपुढे हलगी, ढोल-ताशांचा निनाद सुरु होता. त्यांच्या आवाजावर काही भाविकांनी ठेका धरला होता. यावेळी धनगर समाजातील भाविकांकडून आकर्षक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. प्रतिवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कृष्णाबाईची यात्रा भरली होती.
या यात्रेसाठी दरवर्षी कराडसह तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षीही हा उत्सव मोठ्या भक्तीभावात पार पडला. कृष्णा नदीकाठी असलेल्या हेमाड पंथीय मंदिरात सिंहारूढ अशा अवस्थेत अतिशय सुंदर व तेजस्वी असे रूप असलेल्या कृष्णाबाईची मूर्ती ठेवण्यात आली आहे. कृष्णानदीचे प्रवाहाकडे पाहत असलेल्या अवस्थेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
ग्रामदैवत कृष्णाबाई देवीची मूर्ती ही दशभुजा, सिंहारूढ असून महिषा सुराचा वध करतानाची असून तिचे अतिशय सुंदर व तेजस्वी असे रूप आहे. कृष्णाबाईच्या मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे चाफळचे बाजीपंत करकरे यांनी कोकणात बसविण्यासाठी पांढऱ्या पाषाणाची देवीची मूर्ती उत्तर हिंदूस्थानातून तयार करून आणली होती.पण त्यांच्या पत्नीला ही मूर्ती कृष्णाकाठी स्थापन करावी व कराडच्या अंताजी बहिरव आवटे यांच्या स्वाधीन करावी असा दृष्टांत झाला. म्हणून त्यांनी कराडला कृष्णाकाठी झोपडीवजा जागेत देवीची स्थापना केली.
भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या पत्नी राजसबाई या विटा येथे राहत. त्यांच्याकडे कामासाठी आलेला गुजराथी ब्राह्मण निपुत्रिक मरण पावला. त्यामुळे त्याच्या बेवारशी तीन हजार रूपयांच्या मालमत्तेचा विनियोग झोपडीच्या जागी सध्याचे दगडी हेमाडपंथीय बांधकाम असलेले देऊळ बांधण्याच्या कामी त्यांनी केला. व देवीला कृष्णाबाई हे नाव दिले. त्यानुसार 1709 मध्ये कृष्णाकाठी देवीची स्थापना करण्यात आली.
उत्सव काळात मंदीर परिसरात मोठा मंडप उभारण्यात आला होता. याठिकाणी देवीची उत्सव मूर्ती ठेवून तिच्यावर हळदी-कुंकू वाहण्यासाठी महिलावर्गाने गर्दी केली होती. सकाळी दुग्धाभिषेकाने देवीच्या मूर्तीस स्नान घालून तिची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी पूजेनंतर महाआरती केल्यानंतर देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.