कराड – विघ्नहर्ता श्री गणरायाचे आगमन अवघ्या सहा दिवसांवर आले आहे. गणरायाच्या आरास व सजावटीच्या साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले असून या साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे.
गणरायाचे आगमन आठवड्यावर येऊन ठेवल्याने बाजारपेठेत मोठी उलाढाल होऊ लागली आहे. विविध प्रकारची मखरे, झुंबरे, पूजा साहित्य बाजारपेठेत उपलब्ध आहे. आरास आणि सजावटीचे साहित्य हौसेने खरेदी करताना ग्राहक दिसत आहेत. मात्र सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने यंदा आरास महागल्याचे चित्र आहे.
महापुराचे आणि मंदीचे सावट गणेशोत्सवावर असले तरी लाडक्या गणरायाच्या स्वागतात कोणतीच उणीव राहू नये, यासाठी भक्त दक्षता घेत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आराशीसाठी मखमली, टिकली वर्कचे पडदे आणि कापडी मांडव, कागदी आसने, मंदिरे व फुलोरा, गणरायासाठी छत्र तसेच पेशवाई, पुणेरी आणि शिंदेशाही पगड्या यांना मागणी आहे. कापडी मंडप व स्क्रीन पेंटिंगची आसने आणि तरंगते दिवे, रांगोळी यांना महिलांची पसंती मिळत आहेत.
कागदी मखरे, फायबर मखरे, गौरीकमळ, फुलोरा, सिंहासन यांना नेहमीप्रमाणे मागणी असून 200 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंत त्यांच्या किंमती आहेत. एलईडी माळा, डमरु माळ, चेरीलाइट, एलईडी इंडियमन अशा अवघ्या 50 ते 350 रुपये उपलब्ध आहेत.
गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे, साड्या आणि दागिन्यांची खरेदी महिला मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. गौरी सजावटीचा ट्रेंड रुजला असून तयार गौरी नेण्याकडे महिलांचा कल आहे. लाडक्या बाप्पांसाठी खरेदी करताना ग्राहक सुध्दा फारशी घासाघास करीत नसल्याचे दिसून येत आहे.