सातारा – सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत यांच्यावर रविवारी अनोळखी युवकांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर लिंब येथे तणाव निर्माण झाला असून सोमवारी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. दरम्यान, घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून तालुका पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. या हल्ल्यात सावंत गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. तर संशयित हल्लेखोर हल्ल्यानंतर पसार झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जितेंद्र सावंत लिंब ता. सातारा परिसरातील शेरी येथील वाढदिवस साजरा करून परत येत होते. विठेबंदी विहीर नावाच्या मळ्यातील रस्त्यावर संशयित युवकांनी कोयत्याने दोन ते तीन वार केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. हल्ला केल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत असणार्या जितेंद्र सावंत यांना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्याची माहिती पसरताच कुटुंबिय, समर्थकांनी रुग्णालयात धाव घेतली.
तालुका पोलिसांना घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. संशयितांनी कोणत्या कारणावरून प्राणघातक हल्ला केला? याचे कारण अद्यापही समजलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार तीन युवकांनी हल्ला केलेला आहे. रविवारी रात्री सातार्यात उपचार सुरु असताना आ. शिवेंद्रराजे भोसले रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जितेंद्र सावंत यांच्या प्रकृतीची चौकशी करुन माहिती घेतली.
पोलिसांनी तात्काळ तपास करुन हल्लेखोरांना ताब्यात घ्यावे, अशा सूचनाही आ.शिवेंद्रराजे यांनी पोलिसांना केल्या. दरम्यान, सातारा तालुका पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास पोनि विश्वजित घोडके करत आहेत.