पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ बुधवारी (दि.4) सकाळी 11.00 वाजता शाळेच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर आणि ज्येष्ठ माजी विद्यार्थी प्रभाकर भावे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, उद्योजिका स्मिता घैसास कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असल्याचे साठे यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापिका कल्पना वाघ, शिक्षक धनंजय तळपे, तनुजा तिकोने, भाग्यश्री हजारे, प्रिया इंदूलकर, अर्चना देव, वंदना कदम आदी उपस्थित होते.
शाळेमध्ये स्मार्ट टीव्हीसह ई-लर्निंगची सुविधा, संगीत, चित्रकला, मातीकाम यासाठी सुसज्ज वर्ग, 50 संगणकासह सुसज्ज प्रयोगशाळा, सौरऊर्जा प्रकल्प, ठिबक सिंचन योजना, बागेचे सुशोभिकरण आदी योजना पूर्ण करणार असल्याचे डॉ. साठे यांनी सांगितले.
शाळेची स्थापना 4 जानेवारी 1899 मध्ये झाली. महर्षी धोंडो केशव कर्वे पहिले शाळाप्रमुख होते. इंग्रजी संभाषण, संगणकाचे शिक्षण, मौखिक संस्कृत, गणित प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि वैशिष्टयपूर्ण उपक्रमांमुळे ही मराठी माध्यमाची शाळा आपला दर्जा आणि गुणवत्ता टिकवून आहे. नव्या-जुन्याची सांगड घालत परंपरांचे जतन आणि आधुनिकतेची कास धरून विद्यार्थी घडवत आहेत.