कोल्हापूर – मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करण्यासाठी तसेच कोल्हापूर चित्रनगरी चित्रीकरणाचं आधुनिक स्थळ बनवण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याबरोबरच सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे 101 वे स्मृती वर्ष तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षास अभिवादन करुन हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते झाला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात या स्पर्धा होत आहेत.
कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी 17.10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
हीरकमहोत्सवी राज्य नाट्यस्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक जिल्ह्यांची मागणी असताना देखील राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व सुरु असल्यामुळे कोल्हापूरमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले.
तालुक्यातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर सांस्कृतिक संकुल बनायला हवे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा तयार करण्यासाठीही प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
देशभरातील कलाकार कोल्हापूरमध्ये येण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे. यादृष्टीने कोल्हापूर हून मुंबई, हैद्राबाद, चेन्नई या विमानसेवा नियमित सुरु राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील दुर्मिळ वाद्यांचे जागतिक पातळीवरील संग्रहालय बनायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भालजी पेंढारकर, व्ही शांताराम यांचा वारसा कोल्हापूरला लाभला आहे. विविध मालिकांचे, चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापुरात होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा ठिकाणी कलाकारांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोल्हापूर चित्रनगरीला वैभव मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.