कोल्हापूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी अवघे कोल्हापूर 100 सेकंद स्तब्ध झाले. शुक्रवारी सकाळी ठीक 10 वाजता जिथे आहे तिथे 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला कोल्हापूरकरांनी अनोखी मानवंदना दिली.
शाहू समाधी स्थळ येथे विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, एन.सी.सी.चे विद्यार्थी, नागरिक यांनी स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन केले.. श्री शाहू महाराज की जय ..! जयघोषाने समाधी स्थळ परिसर दुमदुमला.
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्नलवर एस.टी. बसेस, अन्य वाहने, जागेवर थांबवण्यात आली. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी आणि नागरिकांनी उपक्रमात सहभागी होवून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुके आणि कोल्हापूर शहरातून पाच अशा एकूण 17 शाहू ज्योत शाहू समाधीस्थळी आणण्यात आल्या. प्रारंभी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू ज्योतीचे स्वागत केले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या उत्साहाने शाहू प्रेमी कार्यकर्ते शाहू ज्योती घेऊन आले होते. कृतज्ञता पर्वनिमित्त लोकराजाला 100 सेकंद आदरांजली वाहण्याच्या महत्वपूर्ण उपक्रमाची क्षणचित्रे ड्रोनद्वारे टिपण्यात आली.