सातारा – कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने वर्चस्व मिळवत पुरूष व महिला या दोन्ही गटांत जनरल चॅम्पियनशिप पटकावली. सातारा जिल्हा पोलीस दल या स्पर्धेत दुसऱ्या क्रमाकांवर तर सांगली जिल्हा तिसऱ्या स्थानावर राहिला. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस कवायत मैदानावर दि. 12 पासून सुरू असलेल्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप आज (दि. 17) रोजी झाला.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आयजी मनोजकुमार लोहिया, सोलापूर शहर आयुक्त राजेंद्र माने, कोल्हापूरचे अधीक्षक शैलेश बलकवडे, सांगलीचे अधीक्षक दीक्षित गेडाम, सोलापूर ग्रामीणच्या अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील तसेच सर्व जिल्ह्यांचे टीम इनचार्ज उपस्थित होते. या स्पर्धेत परिक्षेत्रातील दीड हजार खेळाडूंनी सहभाग घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाना व खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.
पोलिसांमध्ये सांघिक भावना वाढीस लागावी, तसेच खेळांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पोलीस दलात वेगवेगळ्या पातळ्यांवर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. यंदा कोल्हापूर परिक्षेत्रिय क्रीडा स्पर्धांचे 48 वे वर्ष असून यजमानपदाचा मान सातारा पोलिसांना मिळाला होता. स्पर्धा पार पाडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या महिनाभरापासून परिश्रम घेतले.
साताऱ्याने मिळवले उपविजेतेपद
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने फुटबॉल पुरूष, हॉकी पुरूष, व्हॉलीबॉल महिला, बास्केटबॉल पुरूष, खो- खो महिला, कबड्डी महिला, कुस्ती पुरूष, ज्युदो पुरूष, क्रॉसकंट्री महिला ऍथलेटिक्स महिला या प्रकारांत विजेतेपद पटकावत पुरूष व महिला या दोन्ही गटांत जनरल चॅम्पियनशिप मिळवली. सातारा जिल्ह्याने कुस्ती महिला, ज्युदो महिला, बॉक्सिंग पुरूष, वेटलिफ्टींग पुरूष, वेटलिफ्टींग महिला, जलतरण पुरूष, क्रॉसकंट्री पुरूष, ऍथलेटिक्स पुरूष या प्रकारात विजेतेपद मिळवून या स्पर्धेत जनरल चॅम्पियनशीप उपविजेता होण्याचा बहुमान मिळवला आहे. सांगली जिल्ह्याने व्हॉलीबॉल पुरूष, हॅन्डबॉल पुरूष, खो- खो पुरूष, बॉक्सिंग महिला, बास्केटबॉल महिला या प्रकारात विजेतेपद पटकावत स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले तर पुणे ग्रामीण पोलीस दलाने कबड्डी पुरूष या प्रकारात विजेतेपद पटकावले.