सातारा – जिल्ह्यात लंपी स्किनमुळे सोमवारी 10 जनावरांचा मृत्यू झाला असून आजअखेर 321 पशुधन मृत झाले आहे. महाबळेश्वर वगळता 10 तालुक्यांतील 154 गावांमध्ये लंपी स्किनची लागण झाली आहे. आज अखेर 4 हजार 929 जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव झाला. 1856 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली. लंपी स्किनच्या उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे, शासकीय पशुवैद्यकीय आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. जिल्हयातील गोवर्गीय पशुधनाची संख्या 3 लाख 52 हजार 436 असून आजअखेर 3 लाख 47 हजार 100 पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.
“सीईओं’नी घेतला आढावा
लंपी स्किनच्या पार्श्वभूमीवर नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी सोमवारी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्याकडून लंपी स्किनचा आढावा घेतला. याबाबत पशुसंवर्धन विभाग राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. लंपी स्किनच्या पार्श्वभूमीवर लसीकरणात जिल्हा अग्रेसर असून लवकरच या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल, असे पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लंपी स्किनच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याची सूचना श्री. खिलारी यांनी केली.