सातारा – जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकूण 69 अर्ज दाखल झाले. सर्वसाधारण गटातून 40 तर आरक्षित गटातून 29 अर्ज पहिल्या दिवशी दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनीही पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
बॅंकेची राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून प्राथमिक शिक्षक संघ, समिती आणि स्वाभिमानी परिवर्तन पॅनल अशा तिहेरी लढतीच्या शक्यतेने राजकीय रंगत वाढली आहे. निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यक्रमानुसार सोमवारपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. अजिंक्य कॉलनी येथील निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांच्या दालनामध्ये अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी दिवसभरात 200 फॉर्मची विक्री झाली. आजपर्यंत एकूण 580 अर्जांची विक्री झाली आहे.
महिला गटातून दहा, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून सात, इतर मागास प्रवर्गातून चार व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून आठ आणि सर्वसाधारण मतदारसंघातून 40 असे 69 अर्ज आज दाखल झाले. यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघासाठी कराडमधून आठ, जावळीतून दोन, खटावमधून एक, दहिवडी एक, खंडाळा येथून तीन, गिरवी येथून तीन, तरडगाव येथून 13, मायणी येथून आठ आणि म्हसवड येथून एक असे 40 अर्ज खुल्या प्रवर्गातून दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 21 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे पुढील दोन- तीन दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी उमेदवारांची झुंबड उडणार आहे.