कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी कोल्हापुरात 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली.
शाहू समाधी स्थळ येथे श्री शाहू छत्रपती, विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी स्तब्ध उभे राहून अभिवादन केले.
दरम्यान, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात आज दसरा चौक ते शाहू महाराज समाधी स्थळ इथपर्यंत कॅन्डल मार्च काढत लोक राजाला आदरांजली वाहिली. या कँडल मार्चमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.
दरम्यान, आज सकाळी 10 वाजता 100 सेकंद उभे राहून लोक राजाला आदरांजली वाहूया असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले होते. यानुसार कोल्हापूरकरांनी याला उत्तम प्रतिसाद दिला.