पुणे – क्रूझवरील अमली पदार्थ प्रकरणात ( Cruise ship drugs case ) पंच असलेला व फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या किरण प्रकाश गोसावी (रा. वाशी, नवी मुंबई) याच्या पोलीस कोठडीत एक दिवस वाढ करण्यात आली आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी हा आदेश दिला. त्याला त्याच्या फेसबुक व ई मेलचा पासवर्ड आठवत नसल्याचे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. फरार कालावधीत त्याने सचिन पाटील नावाने बनावट आधारकार्ड बनवून घेतले होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
गोसावी याला पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याने फरार असताना कुसुम गायकवाड हिच्याकडून सचिन पाटील नावाचे बनावट आधारकार्ड बनवून घेतले. याबाबत गोसावी आणि गायकवाड यांच्याकडे एकत्रितपणे तपास करायचा आहे.
आरोपीचे फेसबुक आणि ई-मेल आयडीवरून गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती जमा करायची आहे. तर गोसावी याने फिर्यादी यांची एकूण तीन लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यातील एक लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. मात्र उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी केली.