पुणे – आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सोमजी दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत 11 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश नांदेडकर यांनी याबाबत आदेश दिला. गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीलंकेला पळून जात असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने 1 नोव्हेंबर रोजी दिल्ली विमान तळावरून दोघांना अटक केली होती.
अल्नेश अकील सोमजी (वय 37) आणि पत्नी डिंपल (वय 36 दोघेही रा. कोरेगाव पार्क) असे त्या जोडप्याचे नाव आहे. या प्रकरणी योगेश विष्णू दीक्षित (वय 41, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. सोमजी दाम्पत्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला एम. जी. एंटरप्रायझेस या त्यांच्या एका फर्ममध्ये पैसे गुंतविल्यास त्यावर 24 टक्के वार्षिक परतावा देण्याचे आश्वासन फिर्यादींना दाखविले. त्यानुसार फिर्यादीनी त्यांच्याकडे 66 लाख 90 हजार रुपये गुंतवले होते. त्यापैकी काही रक्कम त्यांनी परत केली.
फिर्यादीसह सोमजीने किरण शेट्टी, माया द्वारकादास चावला यांचीही मिळून एकूण 3 कोटी 37 लाख 90 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी केली. गुन्ह्यातील रक्कमेबाबत ते माहिती देत नाहीत. रक्कम स्विकारलेल्या एम.जी.फर्मची कागदपत्रे मिळून येत नाहीत. त्याबाबतही ते सांगत नाहीत.
अल्नेश याच्यावर यापूर्वी कोरेगाव पार्क आणि अलंकार येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. फसवणूक झालेल्यां गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अॅड. वाडेकर यांनी केली.