सांगली – सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण चांगलच तापलं आहे. दगडफेक आणि हाणामारी केल्या प्रकरणी आतापर्यंत १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा देखील समावेश आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू जानकर (वय 29, रा. भेंडवडे, ता. खानापूर) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जानकर यांच्या फिर्यादीनुसार आमदार पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी आटपाडी पोलीस ठाण्यासमोर गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गटात हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार दोन्ही गटातील दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.