पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावित असलेल्या सनसिटी ते कर्वेनगर पूलासह कोरेगाव पार्क येथील रेल्वे मार्गावरील साधू वासवानी पूल पाडून तेथे नवा पूल बांधण्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे दोन्ही पूल उभारण्यास महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली आहे. सनसिटी पुलासाठी 37 कोटी 4 लाख रु. तर साधू वासवानी पुलासाठी 53 कोटी 55 लाख रुपये खर्च येणार आहे.
दरम्यान, सनसिटी पुलासाठी यापूर्वीच निविदा काढून महापालिकेने कार्यादेशही दिले होते. मात्र, पालिकेने काम दिलेली कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने महापालिकेस कायदेशीर बाबी तपासून पहिली निविदा रद्द करावी लागली होती. त्यात, जवळपास तीन महिन्यांचा कालावधी गेला आहे.
हा पूल झाल्यास सनसिटी ते कर्वेनगर हे सध्या असलेले सहा किलोमीटरचे अंतर अवघे 2 किलोमीटर होणार आहे. तसेच सिंहगड रस्त्याला नवीन पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. मुठा नदीवर हा पूल बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजनही लांबणीवर पडले होते. पण प्रशासनाने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात मान्यता दिली. त्यामध्ये 12 टक्के कमी दराने आलेली निविदा मान्य करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
साधू वासवानी पूल नव्याने बांधणार
तब्बल 49 वर्षांपूर्वीचा साधू वासवानी पूल महापालिका नव्याने बांधणार आहे. रेल्वे रूळावरून हा पूल असून, शहराच्या पूर्वेकडील हडपसर, वानवडी, कोंढवा या भागाला नगर रस्ता, येरवडा, पुढे खडकीकडे जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. हा पूल जुना झाल्याचे स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच या मार्गावर मोठया प्रमाणात वर्दळ वाढल्याने पूल नव्याने बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने निविदा प्रक्रीया राबविली होती. त्यासाठीच्या 53 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. पूलाचे काम सुरू झाल्यानंतर या पुलावरील वाहतूक पुणे स्टेशन परिसरातील रस्त्यावरून वळवली जाणार आहे.
बोपोडी पुलासाठी 18.13 कोटी
दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडण्यासाठी बोपोडी आणि औंध यांच्या दरम्यान मुळा नदीवर पूल उभारला जाणार आहे. दोन्ही महापालिकांना जोडणारा हा पूल असला तरी हे काम पिंपरी-चिंचवड महापालिका करणार असून, त्याचा 50 टक्के खर्च पुणे महापालिका देणार आहे, असे ठरले आहे. 760 मीटर लांब आणि 18.60 मीटर रुंद या पुलासाठी 36.25 कोटी रुपये खर्च येणार आहे.