नवी दिल्ली – पॅरिस ऑलिम्पिकच्या वाटेवर असलेला नेमबाज स्वरुप उन्हाळकर आणि धावपटू सचिन खिल्लारी यांनी खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत बुधवारी(13 डिसेंबर) भारताला सुवर्णपदके मिळवून दिली. पहिले तीन दिवस पदकांचा सपाटा लावलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना बुधवारी मर्यादित यशावर समाधान मानावे लागले.
अथलेटिक्समध्ये एफ ४६ प्रकारात मुंबईच्या सचिन खिल्लारीने १५.६३ मिटर गोळाफेक केली व सुवर्णपदकाची कमाई केली. गिता चव्हाण , दिलीप गावीत व भाग्यश्री जाधव यांच्या प्रपाणेच सचिननेही यश मिळवताना आपला दबदबा राखला. या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राला सहा सुवर्ण तर सहा ब्रॉंझ अशी तब्बल १२ पदके मिळाली आहेत.
नेमबाजीत पॅरिस ऑलिम्पिकच्या वाटेवर असलेल्या स्वरुप उन्हाळकरने आपला लौकिक कायम राखला. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्टॅंडिंग एसएच १ प्रकारात २४३.५ गुणांची कमाई करत सुवर्ण वेध साधला. या स्पर्धा प्रकारात किरण केंगलकर पाचव्या स्थानावर राहिला. स्वरुप ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध करण्याच्या तयारीत असून, अलिकडेच त्याची गुणवत्ता बघून रायफल उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या वॉल्थर कंपनीने त्याला अधुनिक बनावटीची नवी रायफल भेट म्हणून दिली होती. या रायफलशी जुळवून घेण्यास वेळ लागेल. पण, ही भेट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल आणि ऑलिम्पिकमध्ये यश मिळविण्यासाठी कौशल्य पणाला लावेन, असा विश्वास स्वरुपने व्यक्त केला.
Khelo India Para Games 2023 : सुवर्ण षटकारासह महाराष्ट्राची आगेकूच कायम…
महाराष्ट्राला आता शुक्रवारी सुरु होणाऱ्या तिरंदाजी स्पर्धा प्रकारातून चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत महाराष्ट्र ७ सुवर्ण, ६ रजत आणि ११ ब्राँझ असा २४ पदकांसह चौथ्या स्थानावर आहे. हरियाना (२५, ३१, १३) ६९ पदकांसह अव्वल स्थानावर असून, उत्तर प्रदेश (२०, १६, ८) ४४, तमिळनाडू (१४, ४, १०) २८ पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.