ब्रुसेल्स – युक्रेनला युरोपीय संघाचे सदस्यत्व देणे आणि रशियाविरुद्धच्या युद्धासाठी आर्थिक मदत देणे या दोन प्रमुख मुद्यांवर निर्णय घेण्यासाठी युरोपीय संघाच्या सदस्यांची दोन दिवसांची बैठक आजपासून ब्रुसेल्स येथे सुरू झाली. युक्रेनला युरोपीय संघाचे सदस्यत्व देण्याला रशियाचा पहिल्यापासून विरोध आहेच. मात्र आता संघटनेतील सदस्य असलेल्या हंगेरीनेही युक्रेनच्या सदस्यत्वाला विरोध केला आहे.
हंगेरीचे पंतप्रधान विक्टोर ओरबान यांनी दोनच महिन्यांपूर्वी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली होती. त्यांनी युक्रेनला युरोपीय संघामध्ये सदस्यत्व देण्याला आणि युद्धासाठी ५० अब्ज युरो (५४ अब्ज डॉलर) ची मदत देण्याला आपला आक्षेप कायम असल्याचे सांगितले. युक्रेनबाबतच्या वाटाघाटींमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशानेच ते बैठकीमध्ये सहभागी झाले.
युरोपीय संघामध्ये २७ सदस्य देश आहेत. हंगेरी सोडून अन्य सर्व जण युक्रेनच्या बाजूने आहेत. मात्र ही युरोपीय संघाची मोठी चूक असल्याचे ओरबान यांनी म्हटले आहे. युक्रेनला तातडीने आर्थिक मदत हवी आहे. अमेरिका, अर्जेंटिना आणि नॉर्वेचा दौरा करून झेलेन्सकी यांनी मदतीची याचना करायला सुरुवात केली आहे. युरोपीय संघाची मदत ही त्यांच्यासाठी आशेचा किरण असतानाच हंगेरीने त्यांची वाट अडवली आहे.
ओरबान यांच्या भूमिकेवर झेलेन्सकी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युक्रेनला सदस्यत्व मिळू नये असे हंगेरीला वाटण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे. युरोपीय संघाला हंगेरीकडून देण्यात येणारी १०.२ अब्ज युरोची मदत रोखण्याची धमकीही हंगेरीने दिली आहे. युरोपीय संघाचे सदस्यत्व मिळण्यासाठी संघटनेकडून युक्रेनसमोर ७ अटींची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले होते. त्यापैकी केवळ ३ अटींची पूर्तता युक्रेनने केल्याचे ओरबान यांनी म्हटले आहे.