खंडाळा -खंडाळा पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर करम्यात आली असून अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे. काही नेतेमंडळींच्या मतदारसंघात अपेक्षित आरक्षण मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तर अनेक विद्यमान आपला मतदारसंघ आरक्षित झाल्याने अडचणीत आले आहेत.
खंडाळा पंचायत समितीच्या 6 गणांसाठी पंचायत समितीच्या किसन वीर सभागृहात सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे. खंडाळा तालुका पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी समर्थकांची सत्ता आहे. आमदार मकरंद पाटील व माजी आमदार मदन भोसले यांचे गट पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही नेतेमंडळींच्या मतदारसंघात अपेक्षित आरक्षण मिळाल्याने समाधान व्यक्त होत आह.
तर अनेक विद्यमान आपला मतदारसंघ आरक्षित झाल्याने अडचणीत आले आहेत. उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या हातून आरक्षण सोडत काढण्यात आली.यावेळी तहसीलदार दशरथ काळे, नायब तहसीलदार चेतन मोरे आदी उपस्थित होते.
खंडाळा पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे आहे. बावडा गण- सर्वसाधारण महिला राखीव, खेड गण- अनुसूचित जाती जमाती, भादे गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, शिरवळ गण- सर्वसाधारण महिला, नायगाव गण- सर्वसाधारण खुला, पळशी गण- सर्वसाधारण खुला. खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद गटांपैकी खेड गट ओबीसी, भादे गट ओबीसी महिला, शिरवळ गट सर्वसाधारण महिला असे आरक्षण झाले आहे.