प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 –देशात मंकीपॉक्सचे चार रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मंकीपॉक्ससदृश लक्षणे आढळून येणाऱ्या संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे. राज्यातून गेल्या महिन्याभरात 10 संशयित रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील आठ जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून, दोन नमुन्यांचा अहवाल प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
मंकीपॉक्सचा एक जरी रुग्ण सापडला तरी ती “महामारी’ असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या मंकीपॉक्स आजाराची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांवर आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. महिन्याभरापासून सर्वेक्षणावर भर देण्यात आला आहे. मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून, रोगी 2 ते 4 आठवड्यांत बरा होतो.
संशयित रुग्णांचे नमुने महिन्याभरातील आहेत. सर्वेक्षणातून संशयित रुग्ण आढळून आले. दहापैकी तीन जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला असून, इतरांनी देशांतर्गत प्रवास केला आहे. संशयित रुग्णांचे कोणतेही तपशील जाहीर केले जाणार नाहीत.
– डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य