खराळवाडीतील तालमीला अनास्थेचा ‘खो’

42 वर्षे जुनी तालीम बंद ः महापालिकेसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

पिंपरी – एकीकडे जीमच्या वाढत्या “फॅड’मुळे शहरातील तालमींना घरघर लागली असताना दुसरीकडे महापालिका व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेचाही फटका बसत आहे. त्यातून एकेकाळी नावाजलेली खराळवाडीतील तालीम बंद पडली आहे. तरतूद करुनही नूतनीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने तालीमप्रेमी मंडळी नाराजी व्यक्‍त करीत आहेत.

खराळवाडीमध्ये नगरपालिका काळातील तालीम आहे. दिवंगत वस्ताद धर्मा भागुजी कलापुरे यांचे नाव या तालमीला देण्यात आले आहे. खराळवाडीसह, एच. ए. कॉलनी, उद्योगनगर आदी भागातील क्रीडापटू याठिकाणी सरावासाठी येत होते. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर महापालिकेकडून या तालमीची बांधणी करण्यात आली. तरुणाईचा जीमकडे वाढता कल लक्षात घेता तालमीचे रूपांतर जीममध्ये करण्याचे विचाराधीन होते. मात्र, स्थानिक क्रीडापटूंच्या विरोधामुळे दुमजली इमारतीत खालील मजल्यावर तालीम तर वरील मजल्यावर जीम तयार करण्यात आली. व्यायामाचे साहित्य याठिकाणी आणण्यात आले. काही काळानंतर “स्टीम बाथ’ची देखील सोय याठिकाणी करण्यात आली. त्यामुळे तालीम आणि जीम अशा दोन्हींसाठी याठिकाणी गर्दी होवू लागली.

कालानुरूप जीममधील उपलब्ध साहित्य जीर्ण झाले. तर तालीम महापालिका ताब्यात घेत असताना मातीचा हौद व इतर गोष्टींमध्ये बदल करण्यात आला नव्हता. त्यामुळे तालमीतील साधने नगरपालिका काळातील तशीच होती. त्यात इमारतही मोडकळीस आल्याने तालमीच्या नूतनीकरणाची मागणी जोर धरू लागली. त्यानुसार 2016-2017 साली तत्कालीन स्थानिक नगरसेवक कैलास कदम यांनी महापालिकेकडे ही मागणी लावून धरली. त्याबाबत प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला. येथील व्यायामाचे साहित्य बालभवन येथे स्थलांतरीत करण्यात आले. दरम्यानच्या काळात कुठे माशी शिंकली ते समजलेच नाही. तालमीचे नूतनीकरण झालेच नाही.

उलट तालमीला कुलूप लावण्यात आले आहे. कुस्तीप्रेम आणि तालमींमुळे पिंपरी-चिंचवडला “मिनी कोल्हापूर’ असे म्हटले जाते. अनेक नामवंत मल्ल येथील मातीत घडले. शहरातील विविध भागात जुन्या तालमी आहेत. मात्र, महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. क्रीडा मंडळांना काही तालमी चालविण्यास देण्यात आल्या आहेत. तर काही तालीम चालविण्याचे दिव्य स्थानिक ज्येष्ठ वस्ताद मंडळी पार पाडत आहेत. तरुणाईमध्ये फिटनेसबाबत जागरुकता वाढत आहे. जीम पेक्षा जुन्या व्यायामशाळा, तालमींमधील सरावांद्वारे शरीर कमविण्यासाठी क्रीडापटू तसेच अनेक युवकांचा कल आहे. परंतु, एकामागोमाग एक तालमी व व्यायामशाळा बंद पडू लागल्याने क्रीडाप्रेमींमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.

खराळवाडीतील कै. वस्ताद धर्मा भागुजी कलापुरे ही तालीम अत्यंत नावाजलेली अशी होती. तालमीबरोबरच जीमचीही सोय करण्यात आल्याने याठिकाणी गर्दी होत होती. ही इमारत मोडकळीस आल्याने नुतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. याठिकाणी अत्याधुनिक सुविधा देखील प्रस्तावित होत्या. परंतु, हा प्रस्ताव लालफितीत अडकून राहिल्याने तालीम गेली अनेक महिने बंद आहे.

– कैलास कदम, माजी नगरसेवक.

कै. वस्ताद धर्मा भागुजी कलापुरे तालीम गेली अनेक महिने बंद आहे. ती सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र, ती सुरू करण्याबाबत कोणत्याही हलचाली दिसून येत नाहीत. या परिसरातील युवक एच. ए. वसाहतीतील तालमीमध्ये सरावासाठी जातात. त्यांच्या सोईसाठी या तालमीची दुरुस्ती गरजेची आहे.

– ताराचंद कलापुरे, क्रीडा प्रशिक्षक.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.