नगर – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तो झॉंकी है…! अशा सूचक शब्दांत राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपमधील अजूनही नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट संकेत आज नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिले.
नगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन परतल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. तसेच जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील नुकसानीची व करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी खडसेंविषयी भूमिका मांडली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वागत करत आहे.
गेली चाळीस वर्षे पक्ष वाढविण्यात सिंहाचा वाटा असलेले ज्येष्ठ नेते खडसे यांना भाजपने बेदखल केले, याची खंत वाटते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांची योग्य ती दखल घेईल, अशी भूमिका मुश्रीफ यांनी मांडली. राष्ट्रवादीतून बाहेर गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का? या प्रश्नावर मुश्रीफ यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्या संदर्भात भूमिका जाहीर केलेली आहेच. “दिल्या घरी सुखी राहा’, असे पवार यांनीच सांगितलेले आहे. तथापि, नेत्यांचे मेरीट पाहून ज्येष्ठ नेते शरद पवारच निर्णय घेतील, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.