जळगाव – देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यास सर्वांचा नकार होता. पण, गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव मी त्यांना संमती दिली. त्यामुळेच ते प्रदेशाध्यक्ष झाले. मी मित्रत्वाचे नाते जोपासले. पण, त्यांनी माझ्यामागे एक षड्यंत्र, कुभांड रचले अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली व फडणवीसांना लक्ष्यही केले.
दरम्यान, यावेळी त्यांनी भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला. गॅस, डिझेल, पेट्रोल दिवसेंदिवस महाग होत आहे. यासाठी गिरीश महाजन यांनी आंदोलन केले असते तर बरे झाले असते. ते नेहमी आंदोलन, मोर्चे करत असतात. पण, ते फक्त नाटक असतं अशी टीका त्यांनी केली.
गिरीश महाजन माझी मुख्यमंत्रीपदावरून खिल्ली उडवतात. परंतु, मी किमान त्या पदावर गेलो. कुणी पोरीबाळींच्या मागे लागून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जात नाही अशी जहरी टीका खडसे यांनी केली.