नवी दिल्ली – पंतप्रधान संग्रहालय उद्घाटन सोहळ्याला गुरूवारी अनेक माजी पंतप्रधानांच्या परिवारांमधील सदस्य आणि नातलग उपस्थित राहिले. मात्र, देशाला तीन पंतप्रधान देणाऱ्या नेहरू-गांधी परिवारातील सदस्य त्या सोहळ्यापासून दूर राहिले.
उद्घाटन सोहळ्याला लालबहाद्दुर शास्त्री, मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंह, पी.व्ही.नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि एच.डी.देवेगौडा या माजी पंतप्रधानांचे नातलग उपस्थित राहिले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल आणि प्रियंका गांधी यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीचे कारण समजू शकले नाही. पं.जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या रूपाने नेहरू-गांधी परिवाराने देशाला तीन पंतप्रधान दिले. त्यामुळे गांधी परिवाराची सोहळ्यातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
संबंधित संग्रहालयात माजी पंतप्रधानांच्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्या पाहून माजी पंतप्रधानांचे नातलग भावूक झाले. त्यांनी संग्रहालयाच्या उभारणीबद्दल आनंद व्यक्त केला.