मुंबई – मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री ‘केतकी चितळे’ ही तिच्या अभिनयापेक्षा वेगळ्याच कारणाने नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. केतकीच्या काही अशाही पोस्ट आहेत ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. आता पुन्हा एकदा तिने आपल्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती ‘जातीयवाद, सनातनी हिंदू’ अश्या अनेक मुद्यांवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्रावर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर काही वेळाने केतकीने तिची इन्स्टाग्राम स्टोरी डिलीट देखील केल्याच दिसून येत आहे. मात्र, आता तिची ही इंस्टाग्राम पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, पुन्हा एकदा केतकी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
काय आहे? अभिनेत्री ‘केतकी चितळे’ व्हायरल पोस्ट….
केतकी म्हणते.., “समिती कुठली, कशासाठी, निर्माण करण्यामागचा विचार का आला असेल, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. सनातन धर्माला मारणे ते ही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश. स्वघोषित मावळे तर तसेही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा, राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीर नव्हे तर घोर अपमान आहे, पण आम्ही स्वघोषित असल्याने आम्ही काहीही करायला मोकळे आहोत, अगदी ज्या राजाच्या नावाने लढतो त्यांचा अपमान ही, असो) लावून तयार असतातच.
एक मेसेज मिळताच किक मारून अशुद्ध मराठीत (महाराजांना ६ भाषा अस्खलित येत असत, इकडे मात्र – पित्र भाषेची बोंब, असो) आरडाओरडा सुरू सनातनी हिंदू मारला जातोय. मालवणी ऑर्लिम, मुंबई मध्ये मुसलमान किंवा क्रिस्ती आहेत व सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वतः अनुभवली आहे.
चार पैश्यात घोषणा करा, जातीयवाद निर्माण करा, सनातनी हिंदू झोपला आहे याचा फायदा घ्या, जे जागे आहेत त्यांना तुरूंगात टाका व केसेच ठोका; पण लक्षात असुद्या, झोपलेला जेव्हा जागा होतो तेव्हा तो पेटून उठतो. असंही केतकीने म्हटलं आहे. मात्र, नंतर तिने आपली इंस्टाग्राम पोस्ट डिलीट केली आहे.