हैदराबाद – आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी बीआरएसने 115 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री केसीआर उर्फ के. चंद्रशेखर राव हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. यापूर्वी फक्त भाजपने मध्य प्रदेशसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.
मुख्यमंत्री केसीआर कामारेड्डी आणि गजवेल या दोन मतदारसंघातून तर त्यांचे पुत्र मंत्री कलवकुंतला तारका रामाराव सिरिल्लामधून निवडणूक लढवणार आहेत. बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी आगामी राज्य निवडणुकांसाठी 119 पैकी 115 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या आधी भाजपने त्यांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली होती.
पण बीआरएसने जवळपास सर्वच जागांवर उमेदवार जाहीर करुन आघाडी घेतल्याचे चित्र आहे. के. चंद्रशेखर राव म्हणाले, आमची एआयएमआयएम सोबतची मैत्री कायम राहील. तसेच आम्ही आमच्या पक्षाचा जाहीरनामा 16 ऑक्टोबरला वरंगलमध्ये प्रसिद्ध करू. पक्षविरोधी कारवायांमध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला पक्षातून हाकलून दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बीआरएसने आपली उमेदवारी यादी जाहीर करून एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. सर्वात आधी यादी जाहीर करण्यातून एक आत्मविश्वास मतदारापर्यंत पोहोचतो, तसंच उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळतो आणि निवडणूक खर्चाचा हिशेब देण्यातून सुटका मिळते. निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यापासून द्यायचा असतो.
त्यामुळे आतापासून बीआरएसच्या उमेदवारांनी प्रचार सुरू केल्यास किंवा खर्च केल्यास तो निवडणुकीच्या खर्चात दाखवणे बंधनकारक नाही. दरम्यान, तेलंगणात 16 जानेवारीपूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोरमच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकांना लोकसभेची सेमी फायनल असेही म्हटले जाते.