पुणे – धावणे, पोहणे आणि सायकल चालविणे या तीनही प्रकारात खेळाडूंच्या क्षमतेची कठोर चाचणी ठरणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धा ओळखली जाते. ही स्पर्धा एकदा का होईना पूर्ण करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, पुण्यातील जलतरणपटू असलेल्या डॉ. कौस्तुभ राडकर यांनी या स्पर्धेचे 25 वे विजेतेपद मिळवत विक्रम साकार केला. अशी कामगिरी करणारे डॉ. कौस्तुभ हे पहिलेच भारतीय पुरुष खेळाडू ठरले आहेत.
न्यूझीलंड येथील टॉपो लेक या ठिकाणी संपूर्ण आयर्नमॅन ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये डॉ. कौस्तुभ यांनी 25 आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रम केला. या स्पर्धेमध्ये कौस्तुभ यांनी 3.8 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावणे हा स्पर्धेचा संपूर्ण टप्पा पूर्ण करून विक्रमावर नाव नोंदविले.
डॉ. कौस्तुभ राडकर हे मूळचे पुण्याचे असून अमेरिकेमधून त्यांनी शल्य तंत्रामधून पदव्युत्तर पदवी (एम. एस) आणि विद्यावाचस्पती (पीएचडी) या पदव्या मिळविल्या आहेत. आपल्या महाविद्यालयीन काळात फ्री स्टाईल या पोहण्याच्या प्रकारात डॉ. कौस्तुभ यांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम नोंदविले आहेत. त्यानंतर त्यांच्यात धावण्याची आवड निर्माण झाली व त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवीत आपला वेगळा ठसा उमटविला.
आयर्नमॅन ही स्पर्धा शारीरिक श्रमाबरोबरच मानसिक श्रमाची क्षमता पाहणारी स्पर्धा आहे. 25 वेळा आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिलाच भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. याबरोबरच या वर्षी 100 आयर्नमॅन प्रशिक्षित करण्याचा विक्रमदेखील मी करीत आहे, असे डॉ. कौस्तुभ यांनी सांगितले.
अशी असते स्पर्धा
वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते. जलतरण, धावणे व सायकलिंग या तिन्हीचा समावेश असलेल्या या क्रीडा प्रकारातील ही स्पर्धा युरोप व अमेरिकेतील विविध ठिकाणी भरवली जाते. जगभरात या अत्यंत मानाच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी नामांकित खेळाडू वर्षभर तयारी करत असतात. यामध्ये 3.8 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावणे यांचा समावेश असतो.