पुसेगाव -खटाव तालुक्यातील कातळगेवाडी गावचा सुपुत्र व आर्मी एअर डिफेन्सच्या 144 एडी रेजिमेंटचे हवालदार चंद्रकात प्रभाकर जाधव (वय 44) यांचा गुरुवारी दि. 30 जून रोजी रात्री 12 च्या सुमारास देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही बातमी समजल्यावर कातळगेवाडी गावावर शोककळा पसरली. उद्या रविवारी दि. 3 जुलै रोजी सकाळी 7 वाजता जवान चंद्रकांत यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणले जाणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
हवालदार चंद्रकांत यांचा जन्म कातळगेवाडी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कातळगेवाडी जिल्हा परिषद शाळेत झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण निढळ येथील हनुमान विद्यालयात झाले. महिमानगड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 11 वी व 12 वीचे शिक्षण झाले. चंद्रकांत यांचे दोन भाऊ व वडलांनी लष्करात देशसेवा बजावली होती. चंद्रकांत 144 एडी रेजिमेंटमध्ये हवालदार या पदावर नोकरी करताना पंजाबमधील चंदीमंदिर येथे ड्युटी करत होते. त्यांच्या पाठीमागे आई, वडिल, पत्नी, 2 मुले व तीन भाऊ असा परिवार आहे. चंद्रकांत एक महिन्याची सुट्टी संपवून गुरुवारी सकाळीच ड्युटीवर गेले होते.