श्रीगोंदा (प्रतिनिधी) – भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबात आज (दि.७) उभी फूट पडली. आ. पाचपुतेंचे गाव असलेल्या काष्टी ग्रामपंचायतीची निवडणूक या फुटीला निमित्त ठरली असून आ. पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी चुलते आ. बबनराव पाचपुते यांच्यापासून फारकत घेत विरोधी कैलास पाचपुते गटाशी आघाडी केली. त्यामुळे आता काष्टीच्या सरपंच पदासाठी आ. पाचपुते यांचे सुपुत्र प्रताप आणि पुतणे साजन या दोघा चुलत भावांमध्ये लढत रंगणार आहे. दरम्यान, आ. पाचपुते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीची प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये साजन पाचपुते यांनी चुलते आ. बबनराव पाचपुते यांच्यापासून फारकत घेत विरोधी कैलास पाचपुते गटाशी आघाडी केली. साजन पाचपुते हे विरोधी गटाचे सरपंचपदाचे उमेदवार असून त्यांची लढत सत्ताधारी आ. पाचपुते यांचे सुपुत्र प्रताप यांच्याशी होणार आहे.
सख्ख्या चुलत भावांमध्ये सरपंच पदासाठी लढत रंगणार असल्याने काष्टी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने वातावरण चांगलेच तापणार आहे. त्याचबरोबर डॉ. अनिल कोकाटे हे सरपंच पदासाठी अपक्ष मैदानात उतरले आहेत. त्यामुळे काष्टीच्या सरपंच पदासाठी तिरंगी लढत रंगणार आहे.
Maharashtra : आता ‘टीसी’शिवाय मिळणार शाळेत प्रवेश; शासन निर्णय जारी
दरम्यान, आ. बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील कलहाबाबत यापूर्वी अनेकदा चर्चा रंगल्या होत्या. आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने साजन पाचपुते यांनी चुलते बबनराव पाचपुते यांच्यापासून फारकत घेतली. चाळीस वर्षे तालुक्याच्या राजकारणावर पकड ठेवणाऱ्या आ. पाचपुते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रताप बबनराव पाचपुते आणि साजन सदाशिव पाचपुते यांच्यात सरपंच पदासाठी रंगणाऱ्या लढतीकडे तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. या निवडणुकीच्या निकालाचे तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात.