श्रीगोंदा – तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीत विरोधी गटाचा एक सदस्य गळाला लावत लोकनियुक्त सरपंच साजन पाचपुते यांनी चुलते आ. बबनराव पाचपुते यांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिली. तर पारगाव सुद्रीक येथेही विरोधी पाचपुते-नागवडे गटाचे तीन सदस्य फुटल्याने तिथे जगताप गटाचा उपसरपंच झाला. दरम्यान, उपसरपंच निवडीत फोडाफोडीचे राजकारण रंगण्याचे ‘प्रभात’ने वर्तवलेले भाकीत आज (दि.२९) खरे ठरले.
तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची उपसरपंच निवड आज(दि.२९) पार पडली. यामध्ये बहुचर्चित काष्टी ग्रामपंचायतीमध्ये आ. बबनराव पाचपुते गटाच्या अलका शांताराम राहिंज आणि साजन पाचपुते गटाचे राहुल प्रकाश टिमुणे यांच्यात उपसरपंच पदासाठी लढत झाली. साजन पाचपुते यांच्याकडे सरपंचासह आठ सदस्यांचे बळ होते तर आ. पाचपुते गटाकडे सतरापैकी दहा सदस्यांचे स्पष्ट बहुमत होते.
परंतु, आ. पाचपुते गटाचा एक सदस्य फुटल्याने दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी नऊ मते पडली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने सरपंच साजन पाचपुते यांनी विशेषाधिकार वापरीत एक मतदान केले. ते एक मत टिमुणे यांच्या पारड्यात गेल्याने राहुल टिमुणे एक मताने विजयी झाले. ‘काष्टी’त फोडाफोडीचे राजकारण रंगणार असल्याचे भाकीत ‘प्रभात’ने वर्तवले होते, ते तंतोतंत खरे ठरले.
बेलवंडीत जेष्ठनेते अण्णासाहेब शेलार यांच्या गटाकडे एकतर्फी बहुमत होते. तिथे शेलार यांनी उपसरपंचपदासाठी बाबु लक्ष्मण ढवळे यांना पसंती दिल्याने ढवळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. पारगाव सुद्रीक येथे पाचपुते-नागवडे गटाचे अकरा तर जगताप गटाकडे सरपंचासह पाच सदस्य होते. यामध्ये एका सदस्य गैरहजर राहिला. तर विरोधी गटाचे तीन सदस्य फुटल्याने उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सारिका राहुल दानवे या एक मताने विजयी झाल्या.
काष्टीच्या उपसरपंच निवडीत आ. पाचपुते गटाकडे बहुमत असतानाही साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या विशेषाधिकाराच्या जोरावर ‘मास्टरप्लॅन’ बनविला आणि विरोधी गटाचा एक सदस्य गळाला लावत उपसरपंचपद खेचून आणले. साजन पाचपुते यांनी आ. बबनराव पाचपुते यांना जनतेतून सरपंचपदाच्या निवडणुकीत एकदा तर उपसरपंच निवडीत सलग दोनदा धक्का देत ‘काष्टी’चे राजकारण कूस बदलत असल्याचे दाखवून दिले.