समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आमदारकीसाठी बहुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बहुरंगी लढतीत मतविभाजन होणार असल्याने दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या देखील आशा पल्लवित झाल्या आहेत. मतविभाजन झाल्यास “मी पण आमदार होऊ शकतो’ अशी स्वप्ने अनेक नेते पाहू लागले आहेत. आ. बबनराव पाचपुते यांना रोखण्यासाठी श्रीगोंद्यात मागील अनेक निवडणुकांत एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जायचे.
त्यातून माजी आमदार राहुल जगताप यांचा तालुक्याच्या राजकीय पटलावर उदय झाला. परंतु, आता परिस्थिती बदलली असून एकास एक उमेदवार देण्याऐवजी अधिकाधिक उमेदवार रिंगणात उतरल्यास मतविभाजन होऊन आपला फायदा होईल व आपणच आमदार होऊ, अशी स्वप्ने आता अनेक नेत्यांना पडू लागली आहेत. एखाद्याने आमदार व्हावे अगर होऊ नये यासाठी झटण्यापेक्षा रिंगणातील उमेदवार वाढवून स्वहित साधण्यासाठी नेते उत्सुक आहेत.
श्रीगोंद्यात आ. बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार ही चार नावे विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहेत. त्यांची तशी तयारीही सुरू आहे. मागील महिन्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनीही विधानसभा लढविण्याची घोषणा केल्याने त्यांचेही नाव या यादीत जोडले गेले. अण्णासाहेब शेलार यांच्या विधानसभेच्या घोषणेमागे राहुल जगताप अथवा साजन पाचपुते यांचा “हात’ असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात असली तरी शेलार यांचीही आमदार होण्याची मनीषा यापूर्वीही पाहायला मिळालेली आहे.
तालुक्यातील नेत्यांची संख्या मोठी असल्याने मतदारही या नेत्यांमध्ये विभागले गेले आहेत, परिणामी अनेक नेत्यांची ताकद मर्यादित असल्याने या नेत्यांची आमदारकीची स्वप्ने आजपर्यंत पूर्ण होऊ शकलेली नाहीत. मात्र, श्रीगोंद्यातील बहुरंगी लढतीच्या शक्यतेमुळे मर्यादित ताकदीमुळे आमदारकीच्या स्वप्नांना “आवर’ घातलेल्या दुसऱ्या फळीतील काही नेत्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. एकेकाळी एकास एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील राहणारे श्रीगोंद्यातील नेते आता विधानसभेच्या रिंगणात चार-पाच प्रबळ उमेदवार असण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत.
शिवाजी कर्डिलेंची श्रीगोंद्यात चाचपणी?
बहुरंगी लढतीत श्रीगोंद्यातील मतांचे विभाजन होणार असल्यास जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले देखील श्रीगोंद्यातुन लढण्यास उत्सुक असल्याची माहिती समजते. नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमधील ताकद आणि भाजपची उमेदवारी मिळाल्यास कर्डिलेंना श्रीगोंद्यातून आमदारकी काबीज करता येऊ शकते, असा काहींचा अंदाज आहे. त्याअनुषंगाने कर्डिले यांनी श्रीगोंद्यातील काही मंडळींशी चर्चा केल्याचेही समजते.