बेंगळुरू – पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचा मुख्यमंत्री बदलला जाईल या शक्यतांचा इन्कार करीत या राज्यातील भाजपचे प्रबळ नेते बी एस येडियुरप्पा यांनी विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपला कार्यकाळ पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटकात नेतृत्व बदलाबाबत कोणतीही चर्चा पक्षात झालेली नाही असे स्पष्ट करतानाच त्यांनी आपण राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही असेही येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यमान नलिन कुमार कटील यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षाचे नेतृत्व पुढील प्रदेश भाजप अध्यक्षाबाबत निर्णय घेईल असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले. 2023 च्या विधानसभेत पुन्हा भाजपला सत्तेत आणण्यासाठी आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की आता निवडणुकीला सात-आठ महिनेच राहिले असताना बदलांचा प्रश्नच उद्भवत नाही. बसवराज बोम्मई हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. नेतृत्व बदलाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या निराधार आणि अनावश्यक आहे. पत्रकारांनी अशी वृत्ते थांबवावीत असे आवाहनही त्यांनी केले.