बंगळुरू – एकतर्फी प्रेमातून काॅलेजमध्येच विद्यार्थीनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील हुबळी येथे गुरुवारी घडली आहे. नेहा हिरेमठ असे हत्या झालेल्या विद्यार्थीनीचे नाव असून ती येथील हुबळी – धारवाड महापालिकेचे काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची कन्या आहे. फैय्याज (23) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा हिरेमठ हुबळीच्या केएलई टेक्नोलॉजिकल विद्यापीठात एमसीएच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. आरोपीही येथेच शिक्षण घेत होता. त्याचे नेहावर एकतर्फी प्रेम होते. त्यातून त्याने गुरुवारी नेहाची धारदार शस्त्राने कॉलेजमध्येच हत्या केली.
ही संपूर्ण घटना महाविद्यालयाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला तत्काळ पकडण्यात आले. आरोपीचे पालक शिक्षक आहेत. पहिल्या वर्षाच्या परिक्षेत नापास झाल्यामुळे मागच्या 6 महिन्यांपासून तो महाविद्यालयात येत नव्हता. दरम्यान, काॅलेजमध्ये घडलेल्या या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस अधीक तपास करत आहेत.