Karachi Fire : कराचीतील रशीद मिन्हास रोडवरील आरजे मॉलला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मॉलच्या इमारतीत अनेक लोक अडकले आहेत. अग्निशमन दलाने सुमारे 50 जणांना वाचवले आहे. सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
कराचीच्या रशीद मिन्हास रोडवरील आरजे शॉपिंग मॉलमध्ये पहाटे आग लागली. अग्निशमन दलाने सुमारे 50 जणांची सुटका केली परंतु आणखी काही जण इमारतीतच अडकले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इमारतीतून सुटका करण्यात आलेल्या रौफ हमीद यांनी आपबिती सांगितली. त्यांनी यावेळी अनेक लोक अजूनही अडकले असल्याची माहिती दिली.याविषयी बोलताना,“जेव्हा आग लागली तेव्हा आम्ही सुरक्षित खोलीकडे धाव घेऊन स्वतःला वाचवले. धूर इतका तीव्र होता की आम्हाला काय होत आहे ते समजले नाही,” असे त्यांनी सांगितले.
कराचीचे महापौर मुर्तझा वहाब यांनी ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची पुष्टी केली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीत जखमी झालेल्या अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.