कांचन कुल यांच्या नावे 1 कोटी 87 लाखांची मालमत्ता

पुणे – बारामती भाजपचे उमेदवार कांचन कुल यांच्याकडे स्थावर व जंगम मिळून 1 कोटी 87 लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यांचे पती आमदार राहुल कुल यांच्याकडे स्थावर व जंगम अशी एकूण 2 कोटी 57 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात ही मालमत्ता नमूद करण्यात आली असून उत्पनाचे स्रोत शेती असल्याचे नमूद केले आहे. कांचन कुल यांच्याकडे रोख रक्कम 50 हजार रुपये तर पती राहुल कुल यांच्याकडे 1 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. कांचन कुल यांच्याकडे 3 लाख 97 हजार रुपयांच्या मुदतठेवी; तर 21 हजार रुपयांचे शेअर्स आहेत. एलआयसीमध्ये 5 लाख 50 रुपयांची रक्‍कम आहे. त्यांच्याकडे 2015 मध्ये खरेदी केलेली इनोव्हा कार असून त्याची किंमत 15 लाख रुपये इतकी आहे. तर 18 लाख रुपयांचे 550 ग्रॅम सोने तर साडेतीन किलो चांदी आहे. 44 लाख 70 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. राहू ता. दौंड येथे शेतजमीन आहे. येरवडा येथे 1 हजार 170 चौरस फुटांची सदनिका असून सध्या त्याचे मूल्य 82 लाख 23 हजार रुपये इतके आहे. या स्थावर मालमत्तेची एकूण किंमत 1 कोटी 42 हजार रुपये इतकी आहे. तसेच, कांचन कुल यांनी पीक कर्ज आणि वाहन कर्ज घेतले असून एकूण 6 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर आहे.

त्यांचे पती राहुल कुल यांच्याकडे 24 लाख 41 हजार रुपयांच्या मुदतठेवी आहेत. तसेच, 1 लाख 12 हजार रुपयांचे शेअर्स असून एलआयसीमध्ये 14 लाख 57 हजार रुपयांची गुंतवणूक आहे. कुल यांच्याकडेही इनोव्हा कार आहे. 225 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 7 लाख 38 हजार रुपये इतकी असून दीड किलो चांदी आहे. राहुल कुल यांच्याकडे 67 लाख 42 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेमध्ये राहू 3 हेक्‍टर जमीन असून येथेच 21 हजार चौरस फूटांचे बांधकाम आहे. राहुल यांच्यावर 15 लाख 59 हजार रुपयांचे कर्ज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.