भोपाळ : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आई माधवी राजे, पत्नी प्रियदर्शनी आणि मुलगा आर्यमन आले होते. या भेटीचा फोटो ज्योतिरादित्यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर लगेच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपाच्या खासदारांना संबोधित करत असताना मोदी यांनी म्हटले होते की, परिवारवादाच्या विरोधात आहे. पक्षाच्या नेत्यांच्या मुलांना निवडणुकीत तिकीट न मिळण्यामागे आपणच होतो, असे ते म्हणाले. या वक्तव्यानंतर मध्य प्रदेशच्या भाजपा नेत्यांची चिंता वाढली आहे.
यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी से सपरिवार सौजन्य भेंट की। @narendramodi pic.twitter.com/JUc9EUvMcz
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 30, 2022
दीड वर्षांनी मध्य प्रदेशच्या निवडणुका आहेत. विधानसभेच्या रिंगणात अनेक नेत्यांनी त्यांची पुढची पीढी राजकारणात आणण्याची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. त्यातच बुधवारी शिंदे त्यांची आई, पत्नीसोबत मुलालाही मोदींच्या भेटीला घेऊन गेले होते. आता ही भेट खासगी होती की राजकीय याची माहिती अजून तरी समोर आलेले नाही. परंतू आपल्या मुलाला राजकारणात उतरवण्याची तयारी शिंदे यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.