नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर काल झालेल्या आंदोलनाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत एकूण 8 जणांना अटक केली आहे. दिल्ली पोलीस आणखी आंदोनकर्त्यांचा शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली असून हे पथक आंदोनकर्त्यांचा शोध घेत आहेत.
काश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबत दिल्ली विधानसभेत दिलेल्या वक्तव्यासंदर्भात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने केली. यावेळी केजरीवाल यांच्या निवासस्थाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह बॅरीकेडची तोडफोड करण्यात आली होती.
काही समाजकंटकांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह बॅरीकेडची तोडलेफोड केली असा आरोप आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी केला होता. शिवाय दिल्ली पोलिसांच्या सहकार्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आपकडून करण्यात आला होता. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करुन तोडफोड केल्याचा आरोपही आपने केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर या हल्ल्याचा आरोप लावला आहे.