ओतूर (प्रतिनिधी) : करोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करताना प्रशासनाशी समन्वय साधताना, नागरिकांच्या समस्यांचे निवारण करताना अनेकांशी संपर्क येत असलेल्या जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती जाहीर केली आहे. ते आठवडाभर विलगीकरणात राहणार आहेत.
बेनके यांनी म्हटले आहे की, समस्त जुन्नरकरांसाठी आज मी एक महत्वाची माहिती आणि संदेश देत आहे. योग्य ती काळजी घेत असलो तरीही कामानिमित्त फिरताना कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क आल्याने आणि काही प्रमाणात लक्षणे आढळून आल्याने सोमवारी (दि. 6) मी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करोना टेस्ट करण्यात आली व सुदैवाने ती निगेटिव्ह आली आहे. तसेच 11 जुलै रोजी दुसरी टेस्ट करण्यात येणार आहे; परंतु खबरदारी म्हणून डॉक्टरांनी त्यांना 7 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात राहण्यास सांगितले आहे.
या काळात आमदार बेनके हे कोणालाही भेटू शकणार नाहीत. तरीदेखील जनतेप्रती असलेल बाधिलकी त्यांना स्वस्थ बस देत नाही. त्यामुळे त्यांची तालुक्यातील बाकीची कामे सुरू राहणार आहेत. यासाठी ते स्वतः लक्ष ठेवून आहेत. प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांशी ते संपर्क ठेवून आहेत. अत्यावश्यक काम असल्यास पुष्कर ब्रह्मे अथवा प्रसाद पानसरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यांनी केले आहे.