लखनौ : उत्तरप्रदेशातील कानपूर येथे 3 जुलै रोजी गुन्हेगारांची एक टोळी आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत तीन उपनिरीक्षक, एक पोलिस उपअधिक्षक आणि चार कॉन्स्टेबल असे आठ पोलिस कर्मचारी शहीद तर अन्य सात जण जखमी झाले होते.
दरम्यान, या प्रकरणी आता उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती एक महत्वपूर्ण माहिती लागली आहे. याबाबत कानपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक दिनेश प्रभू यांनी माहिती देताना, ‘पोलीस विकास दुबे याच्या घरावर छापा टाकणार असल्याची टीप उत्तर प्रदेश पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनीच दुबे याला दिली होती.’ असा खुलासा केला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांतर्फे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती देण्यात आली असून चौबेपूर स्टेशनचे अधिकारी विनय तिवारी व बीट प्रभारी के. के शर्मा अशी या दोघांची नावे आहेत. घडलेल्या चकमकीबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलिस अधीक्षक दिनेश प्रभू यांनी, ‘तिवारी व शर्मा या पोलीस कर्मचाऱ्यांनी गुंड दुबे यास पोलीस धाड टाकणार असल्याची माहिती दिल्याने तो पोलिसांवर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसला होता. पोलीस पथक दिक्रु गावात गेले असताना रस्त्यावर अडथळे निर्माण करून दुबे व त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला.’ असं सांगितलं.
कोण आहे विकास दुबे? दुबे हा सुमारे 60 गुन्ह्यातील आरोपी आहे. आत्तापर्यंत त्याने अनेकांच्या हत्या केल्या आहेत. भाजपचा मंत्री दर्जाचा एक नेता संतोष शुक्ला यांची त्याने सन 2001 मध्ये पोलिस ठाण्यात घुसून हत्या केली होती.
As per evidence, it has been found that police personnel Vinay Tiwari & KK Sharma had informed Vikas Dubey about the raid beforehand. So, he was on alert and planned to attack police which resulted in the death of 8 policemen: SSP Kanpur Dinesh Prabhu. #KanpurEncounter pic.twitter.com/ypKZeMMpY7
— ANI UP (@ANINewsUP) July 8, 2020