पुणे – सीओईपी मैदानातील जम्बो कोविड हॉस्पिटलचे व्यवस्थापन “लाइफलाइन’ एजन्सीकडून काढून घेतले आहेच त्याच्या ऐवजी आता पिंपरी-चिंचवड येथील मगर स्टेडियममध्ये ज्या “मेडब्रो’ एजन्सीने काम केले आहे. त्या एजन्सीलाच पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटलचे व्यवस्थापनाचे काम देण्यात आले आहे.
“लाइफलाइन’ ही मुंबईची एजन्सी होती. त्यांनी डॉक्टरांची आणि अन्य पॅरामेडिकल स्टाफ यांच्या भरतीविषयी वाईट कामगिरी केली. मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी वास्तविक त्यांना आठ ते दहा दिवसांचा वेळ दिला होता. परिणामी, नागरिकांमधून नाराजी व्यक्त झाली. त्यांच्याकडून जे मनुष्यबळ अपेक्षित होते ते उपलब्ध करून देण्यात ते असमर्थ ठरल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
“महापालिकेने त्यांना औषधे आणि अन्य सोयीही दिल्या होत्या. “आज आठ डॉक्टर येतील, उद्या येतील,’ “गाडीमध्ये बसले आहेत,’ “आज एवढा एवढा स्टाफ जॉइन होईल’ असे “लाइफलाइन’कडून सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यांना पुण्यात मनुष्यबळच उभारता आले नाही. त्यांनी अनेक डॉक्टरांना, अन्य स्टाफला प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न केला, तेही त्यांना शक्य झाले नाही.
आता सध्या महापालिकेने दिलेला स्टाफ तेथे आहेच. त्यामुळे जे रुग्ण दाखल आहेत, त्यांची देखभाल चांगल्याप्रकारे केली जात आहे,’ असे आयुक्त कुमार यांनी नमूद केले.
लाइफलाइन कंपनीच्या कारभाराचे पितळ उघडे पडल्यानंतर त्यांनी महापालिकेवर आरोप करण्याला सुरूवात केली. महापालिकेकडून औषधे मिळत नाहीत आणि अन्य तक्रारी केल्या. याशिवाय राजकीय हस्तक्षेप असल्याचाही आरोप केला.
– विक्रमकुमार, आयुक्त, मनपा