पुणे- शहरातील हॉस्पिटलमध्ये कोविड-19 च्या रूग्णांसाठी किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती “डॅशबोर्ड’साठी न देणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिला आहे. वारंवार त्यांना नोटीस देऊनही ते मुजोरीपणा करत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करणे भाग आहे असे त्या म्हणाल्या.
करोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या “डॅशबोर्ड’वर खोटी माहिती असल्याच्या तक्रारी वारंवार नागरिकांकडून होत आहेत. डॅशबोर्डवर बेड उपलब्ध दाखवले जातात, पण प्रत्यक्षात त्या रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसतात.
डॅशबोर्डवर खाजगी हॉस्पिटल प्रशासनांनी खरी माहिती द्यावी यासाठी महापालिकेने वारंवार खासगी रुग्णालयांना नोटीस दिल्या आहेत. मात्र हे रुग्णालय त्याला जुमानत नाहीत. त्यामुळे आता थेट कारवाईच केली जाणार असल्याचे अग्रवाल म्हणाल्या.
दळवी हॉस्पिटलमध्ये 100 ऑक्सिजन बेड
महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये 100 ऑक्सिजन बेड आणि 10 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली असून, येथे 25 जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची क्षमता असलेले तीन “डोरा सिलिंडर’ बसवण्यात आले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची उपलब्धता वाढली आहे.