नवी दिल्ली – अमेरिकेची औषध कंपनी जॉनसन अँड जॉनसनने भारत सरकारकडे लस मंजुरीचा प्रस्ताव ठेवला आहे. सरकारने या लसीला मंजुरी दिल्यास भारतात करोना विरुद्धच्या लढाईसाठी चौथी लस उपलब्ध होणार आहे.
सध्या देशात कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे डोस दिले जात आहेत. या तिन्ही लसींचे दोन डोस दिले जात आहेत. आतापर्यंत या लसींच्या माध्यमातून सुमारे 49 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जर जॉनसन अँड जॉनसन लसीला मंजुरी मिळाली, तर सिंगल डोस असलेली पहिली लस ठरेल.
कारण या लसीचा एकच डोस द्यावा लागतो. या लसीला मंजुरी मिळाल्यास देशातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. कमी वेळात मोठ्या प्रमाणात लसीकरण होणार आहे. करोनावर जॉनसन अँड जॉनसनची लस 85 टक्के प्रभावी असल्याचा या कंपनीचा दावा आहे.
तसेच साउथ आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दरम्यान, डेल्टा व्हेरिएंटवर तिची उपयुक्ततता किती आहे हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. मात्र सध्या हाच व्हेरिएंट जगाच्या चिंतेचा विषय ठरला आहे.