नवी दिल्ली – देशातील करोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन वाढवण्यात येणार असून कोविशिल्डचे उत्पादन दरमहा 11 कोटींवरून 12 कोटी केले जाणार आहे. तसेच कोव्हॅक्सिनचे उत्पादन दरमहा अडीच कोटींवरून 5.8 कोटी इतके केले जाणार आहे अशी माहिती सरकारतर्फे आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री भारती पवार यांनी संसदेत एका लेखी उत्तरात दिली.
त्यांनी सांगितले की, 16 जानेवारी ते 5 ऑगस्ट या काळात सीरम इन्स्टिट्युटने कोविशिल्डेचे 44 कोटी 42 लाख डोस देशात पुरवले आहेत. तर याच काळात कोव्हॅक्सिनचे 6 कोटी 82 लाख डोस पुरवण्यात आले आहेत.
देशात आणखी लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्यांच्या क्लीनिकल ट्रायलला मान्यता देण्याचे निर्णय वेगवान पद्धतीने व्हावेत अशा उपाययोजना सरकारकडून करण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.
लसींच्या उत्पादन वाढीसाठी विविध सरकारी संस्था तसेच खासगी संस्थांना तंत्रज्ञान उपलब्ध करून त्यांच्या मार्फत उत्पादन वाढीचा प्रयत्न केला जात आहे असेही मंत्र्यांनी सांगितले.