हैदराबाद – जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या करोना लसीची निर्मिती भारतातील बायोलॉजिकल ई या संस्थेकडून करण्यात येणार आहे. त्याचरोबर या कंपनीकडून त्यांच्या वेगळ्या करोना लसीचीही निर्मिती केली जाणार आहे. विदेशी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना यासंदर्भातील माहिती कंपनीच्या कार्यकारी संचालकांनी दिली. सध्या असलेल्या लसींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
दोन्ही लसींच्या निर्मितीसाठीच्या पायाभूत सुविधा आणि प्लांट वेगळे असणार असून, प्रत्येक लस स्वतंत्र पातळीवर तयार केली जाणार आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या चाचणीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता लसीच्या निर्मितीसंदर्भात हे पाऊल उचलले गेले आहे.
बायोलॉजिकल ई ही हैदराबाद येथील संस्था आहे. ऑगस्ट महिन्यापासून या संस्थेकडून दरवर्षी 75 ते 80 दशलक्ष लसींची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 2022 पर्यंत 1 अब्ज लसींची निर्मिती करण्यासाठी या संस्थेला अमेरिकेकडून अर्थसाह्य दिले जाणार असल्याचीही बातमी आहे.