नवी दिल्ली : भारतात सध्या लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आता भारतीय Biological E. ही संस्था तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. Biological E. ही कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या कोरोना लसीची निर्मिती करणार आहे. सोबतच या कंपनीकडून त्यांच्या वेगळ्या कोरोना लसीचीही निर्मिती केली जाणार आहे.
Biological E. च्या कार्यकारी संचालकांनी एका इंग्रजी वर्तमानपत्रासोबत संवाद साधताना यासंदर्भातील माहिती दिली. त्यांच्या या निर्णयामुळे भारतात जाणावणारा लसींचा तुटवडा आणि पुरवठा यावर तोडगा निघण्यास मदत होणार आहे.
‘दोन्ही लसींच्या निर्मितीसाठीच्या पायाभूत सुविधा आणि प्लांट वेगळे असणार असून, प्रत्येक लस स्वतंत्र पातळीवर तयार केली जाणार आहे’, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या चाचणीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता लसीच्या निर्मितीसंदर्भात हे पाऊल उचलले गेले आहे.
Biological E. ही दक्षिण भारतातील हैदराबाद येथील संस्था आहे. या संस्थेकडून ऑगस्ट महिन्यापासून दर वर्षी 75 ते 80 मिलीयन लसींची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ही लस ह्युस्टनमधील Baylor College of Medicine आणि Dynavax Technologies Corp यांच्या प्रयत्नांतून तयार करण्यात आल्याची माहिती आहे.
2022 हे वर्ष संपण्यापूर्वी 1 बिलीयन लसींची निर्मिती करण्यासाठी बायोलॉजिकल ई. या संस्थेला अमेरिकेकडूनही अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.