वॉशिंग्टन – करोनावर लस तयार करण्याचे जगभरात प्रयत्न सुरू आहेत. विषाणूच्या दहशतीमुळे सगळेच अत्यंत वेगाने केले जात आहे. यामध्ये अमेरिकेतील जॉन्सन अॅण्ड जॉन्सननेही करोना प्रतिबंधक लस तयार केली आहे.परंतु, या लसीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. या लसीमुळे एका स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आले आहेत. यातच आणखी अमेरिकेत लशीच्या बरोबरीने आणखी एका औषधाची मानवी चाचणी थांबवण्यात आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, २४ तासात अमेरिकेत निर्णायक टप्प्यावर असलेल्या दोन औषध चाचण्यांना सुरक्षेच्या कारणास्तव ब्रेक लागला आहे. करोना व्हायरस विरोधात प्रभावी औषध निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांना हा एक झटका आहे. अमेरिकन औषध कंपनी एली लिलीने अँटीबॉडी उपचार चाचणी स्थगित केली आहे.
तत्पूर्वी, जॉन्सन अँड जॉन्सनची AD-26-SOV 2-S लस क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात असणारी अमेरिकेतील चौथी लस आहे. परंतु, लस प्रभावी ठरली जात असतानाच अचानक लसीच्या चाचण्या थांबवल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्ताला जॉन्सन अॅण्ड जॉन्सननेही दुजोरा दिला आहे. करोना लसीच्या चाचणीमध्ये सहभागी असलेल्या काही स्वयंसेवकांना अचानक आजारपण आल्यामुळे या चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्याचे जॉन्सन अॅण्ड जॉन्सनकडून सांगण्यात आले आहे.